Jalgaon Train Accident : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, हा अपघात नेमकं कसा घडला? या अपघातासाठी कोण जबाबदार आहे? याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२३ जानेवारी) माध्यमांशी बोलताना दिली. ‘एका चहा विक्रेत्याने रेल्वेतील एका डब्यात आग लागल्याची ओरड केली. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या मारल्या. मात्र, ही घटना फक्त आणि फक्त अफवांमुळे घडली’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“जळगावमध्ये रेल्वे अपघाताची घटना घडल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थाळी पोहोचून मदतकार्य केलं. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, रेल्वेच्या एका डब्यातील रसोईतील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागली म्हणून आरडाओरड केली. आग लागली या भितीने त्या पूर्ण डब्यात गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातही मोठा गोंधळ निर्माण झाला, तेव्हा काही प्रवाशांनी घाबरून स्वत:चा जीव वाचवा म्हणून रेल्वेतून खाली उड्या मारल्या”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
#WATCH | Jalgaon train accident | Morning visuals from the incident spot
— ANI (@ANI) January 23, 2025
12 people died and several others were injured after the passengers of Pushpak Express were hit by Karnataka Express in Pachora of Jalgaon district. pic.twitter.com/2jtxE7ftuw
“तसेच रेल्वे वेगाने असल्यामुळे काही प्रवाशांना उतरता आलं नाही. त्यामुळे कोणीतरी रेल्वेची साखळी ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली आणि प्रवाशी खाली उतरले. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या शेजारच्या रेल्वे ट्रॅकवरून कर्नाटक एक्स्प्रेस अतिशय वेगाने आली आणि रुळावरील प्रवाशांना चिरडलं. त्यानंतर ती गाडी पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १० लोकांची ओळख पटलेली आहे. अद्याप तीन लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच ही घटना निव्वळ अफवांमुळे घडलेली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.