लोकसभा निवडणुकीचा निकाल आता ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासूनच विधानसभेच्या तयारीला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक विधान केलं. ‘लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही’, असं अजित पवारांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो. तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या. शिवसेनेला ठोका. महाविकास आघाडीत एकत्र असताना. मग मी त्यांना विचारायचो का? तर ते म्हणायचे की, शिवसेनेला ठोकल्यावर (टोकाची भूमिका घेतल्यावर) अल्पसंख्यांकाना समाधान मिळतं, म्हणजे हे शिवसेनेला विरोध करतात. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक शिवसेनेसोबत (ठाकरे गटासोबत) जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, अजित पवारांनी केलेलं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
हेही वाचा : “मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो?” ठाकरे गटाचा मोदींना टोला
‘या’ जिल्ह्यात जातीवादावर निवडणूक
अजित पवार पुढे म्हणाले, “बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असं काही वातावरण गावात पाहायला मिळालं. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसतो आहोत. ज्यावेळी आपण महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मानतो. त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढे जातो. आता शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीसंदर्भात छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, आपण सरकारमध्ये असेपर्यंत तसं काहीही होऊ देणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
“एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.