Ajit Pawar On Amit Shah Statement : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. तसेच उमेदवारांची चाचपणी सुरु असून जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. अशातच काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा आहे. एवढंच नाही तर अजित पवार तिसऱ्या आघाडीचा चेहरा असतील अशा चर्चाही मध्यंतरी राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र, आता या चर्चांवर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. “मी तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईल हे ऐकून करमणूक होते”, अशा मिश्किल शब्दांत अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. तसेच ‘राज्यात एका पक्षाच सरकार सत्तेत येऊ शकत नाही’, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“मी तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईन हे ऐकून आमचीही करमणूक होते. आता काय करणार? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करत असताना टिव्ही पाहत असतो. तेव्हा काही बातम्या आम्हालाच कळत नाहीत आणि त्या ठिकाणी सुरु असतं की ब्रेकींग न्यूज. मात्र, अनेकदा त्यामध्ये काही तथ्य नसतं. राज्यात तिसरी आघाडी होईल किंवा चौधीही होईल. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांचे काही उमेदवार जाहीर केले आहेत, त्यामुळे सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे, त्यामुळेच…”; देवेंद्र फडणवीस यांची टीका

“आपल्या राज्यात राजकीय परिस्थिती इतर राज्याच्या तुलनेने फार वेगळी आहे. सध्याच्या परिस्थितीत एका पक्षाच सरकार सत्तेत येऊ शकत नाही. राज्याची राजकीय आणि सामाजिक, भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, तर दुसऱ्या राज्याची परिस्थिती वेगळी आहे. मग पंजाब, दिल्ली, तेलंगना किंवा आध्र प्रदेश घ्या. तिकडे एका पक्षाचे सरकार आहेत. मात्र, आपल्या राज्यात १९८५ नंतर जवळपास ४० वर्ष होतील, या राज्यात एका पक्षाच सरकार आलेलं नाही”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी काय भाष्य केलं होतं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केलं. याचवेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आणायची आहे. मात्र, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एकट्या भाजपाच्या जीवावर सत्ता आणायची आहे”, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, याच संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात जवळपास ४० वर्ष होतील एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. सध्या राज्यात राजकीय परिस्थिती इतर राज्याच्या तुलनेने फार वेगळी आहे. त्यामुळे एका पक्षाच सरकार सत्तेत येऊ शकत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.