Ajit Pawar On MSRTC : राज्य एसटी महामंडळाने जवळपास गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. यातच या वर्षी अनेक नव्या बसेस एसटीच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीचा प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता यासंदर्भातील महत्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार आहे का? एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे का? असे सवाल विचारले. यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे अद्याप एसटीच्या तिकीटात दरवाढ करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही. तसेच आता काही नवीन बसेस एसटीच्या सेवेत दाखल होणार असून त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं सूचक भाष्यही अजित पवार यांनी यावेळी केलं.
अजित पवार काय म्हणाले?
“एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. मात्र, एक आहे की एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत. त्यामध्ये चांगल्या बससाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मग त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता उद्या जर एसटीच्या तिकीट दरात वाढ करायची म्हटलं आणि जर एसटी बस खराब असतील तर लोक म्हणतील की बस खराब आहेत, मग कुठे भाडेवाढ करता? त्यामुळे आम्ही एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या संदर्भात चर्चा करू आणि योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्तास एसटीच्या तिकीट वाढीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला नसल्याची माहिती सांगितली असली तरी भविष्यात एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यासंदर्भात त्यांनी सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी येत्या काळात एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.