राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी त्यांच्या खास शैलीत एखाद्याला उत्तर देतात. तर कधी कधी ते आपल्या भाषणात मिश्किल स्वभावाने उत्तर देतात. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुले आव्हान दिले आहे. “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”, अशा खास आपल्या शैलीत अजित पवारांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“दिलीप वळसे पाटील यांचा शपथविधी झाला की यांची (अशोक पवार यांची) सटकली. हे म्हटले की, दादांनी दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असते तरी आमचे कामे झाली असती. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते. त्यांच्या कानात यांनी (अशोक पवार यांनी) सांगितलं. आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदाराने सांगितलं. त्यानंतर ते तिकडे (शरद पवार गटात) गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली अन् मंत्री व्हायला निघालेत. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तुम्ही आमदरच कसा होता ते बघतो. मी लोकांना सांगेन की यांची खरी औकात काय आहे?”,असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना दिले.
हेही वाचा : अंगावरून साप गेला आणि आठ दिवसांनी शरद पवार मुख्यमंत्री झाले; सुप्रिया सुळे यांनी सांग…
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लोकसभेची लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून खासदार डॉ.अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव-पाटील मैदानात आहेत. शिरूर लोकसभेच्या या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं. अमोल कोल्हे कसे निवडून येतात तेच पाहतो, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिले आहे.