Ajit Pawar On Sandeep Kshirsagar : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. असं असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची जुन्नरमध्ये येऊन भेट घेतल्याने अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या.
तसेच संदीप क्षीरसागरांनी जुन्नरमध्ये येऊन अजित पवारांची भेट का घेतली? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, त्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत स्पष्टीकरण देत भेटीचं कारण सांगितलं आहे. “मला संदीप क्षीरसागर भेटले, पण त्यांच्या बीड शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत ते मला भेटले”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“बीड नगरपालिकेचं वीज बील थकलेलं आहे. त्यामुळे एका जिल्ह्याच्या ठिकाणी २१ दिवसांनी पाणी पुरवठा होतो हे योग्य नाही. त्यामुळे संदीप क्षीरसागर तक्रार करत होते की यामधून काहीतरी मार्ग काढा. वीज बील थकलेलं आहे ते कनेक्शन सुरु करून त्यामधून आम्हाला मार्ग काढून द्या. त्यासाठी आमदार क्षीरसागर भेटायला आले होते. यापेक्षा दुसरे काहीही नाही. शेवटी कसं असतं की मी देखील विरोधी पक्षाचा आमदार होतो. तेव्हा माझंही काही काम असेल तर मी त्या ठिकाणच्या मंत्र्यांना जाऊन भेटत होतो. त्यामुळे यामधून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तसेच त्यांच्याबरोबर माझी दुसरी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
“उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीडच्या नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे. त्यासंदर्भाने मी अजित पवार यांची भेट घेतली आहे. आजही आमची योजना तयार असताना वीज बील भरलं नाही म्हणून कनेक्शन जोडलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही बीड शहराला १५ ते २० दिवसांनी पाणी मिळत आहे. ही अडचण मी अजित पवार यांना सांगितली आहे. तसेच या भेटीची कोणतीही गुप्तता पाळलेली नव्हती”, असं स्पष्टीकरण आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे.