Shirdi NCP Adhiveshan : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचं शिर्डीत अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. तसेच कामाला लागण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. या अधिवेशनात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एक महत्वाचं आणि सूचक विधान केलं. “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असं सूचक भाष्य अजित पवारांनी केलं.
अजित पवार काय म्हणाले?
“पक्षाच्या पुढील वाटचालीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शिबीर आयोजित करण्यात आलं. खरं तर सर्व नेत्यांनी सकाळी कामाला लवकर सुरुवात केली पाहिजे. सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे. मला असं वाटायचं की मीच सकाळी फार लवकर कामाला सुरुवात करतो. आता परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्यांचे अनुभव सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तेव्हा ते म्हणाले मी फक्त साडेतीन तास झोपतो, पहाटे साडेतीन वाजता उठतो. त्यानंतर दररोज योगा करतो, असं त्यांनी सांगितलं”, असं अजित पवार म्हणाले.
‘महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार’
“मला कार्यकर्त्यांना एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत किंवा पक्षाच्या पदासाठी उत्सुक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्तित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. आता यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागानुसार होईल. महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काहींनी चारचा प्रभाग करा, काहींनी दोनचा प्रभाग करा अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आणि चारचा प्रभाग करण्यात आला”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
‘येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…’
“योग्य नियोजन केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे. पक्षाचं संघटन वाढण्यासाठी तरुण आणि तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा काळ असला पाहिजे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपआपल्या गावात पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गावात, गल्लीत पक्षाचा कार्यकर्ता आणि आपल्या पक्षाचा झेंडा किंवा बोर्ड लागला पाहिजे. प्रत्येक घराघरांपर्यंत आपला पक्षाचा विचार पोहचायला हवा”, असं अजित पवार यांनी म्हटलं.