लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरु आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते ठिकठिकाणी सभा, मेळावे घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चांगलीच तंबी दिली. ‘विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अन्यथा मी ऐकूण घेणार नाही. महायुतीचा धर्म पाळा’, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
अजित पवार काय म्हणाले?
“मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपण अनेकांना ओळखतो. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मात्र, माझी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, १३ तारखेचे मतदान होईपर्यंत कोणालाही भेटायला जाऊ नका. दादा सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो, गप्पा नको आणि टप्पा नको. मैत्री नातं-गोतं भावकी-रावकी बाजूला ठेवा. महायुतीचा धर्म पाळा”, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, “समोरचा उमेदवार सांगेल दादांनीच मला पाठवलेय. दादांनीच मला उभा राहा म्हणून सांगितलेय. पण हे धांदात खोटे आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, मी स्पष्ट आणि खरा बोलणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. धनुष्यबाण ऐके धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मावळमध्ये चालवायचे आहे”, असे अजित पवार म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्णय घेण्याची क्षमता आपण पाहिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. यामध्ये आपण मागे राहता कामा नये. विरोधकांकडून आरोप होत आहे की, संविधान बदण्याचे काम होत आहे. पण कुठेही संविधान बदलण्याचे काम झाले नाही. १० वर्षात कुठेही संविधान बदलण्याचे काम झाले नाही, विरोधक वाटेल ते बोलत आहेत”, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.