Ajit Pawar On Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना एक दावा केला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते’, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, “ते (संभाजी भिडे) काही बोलू शकतात. मात्र, सत्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्व धर्म आणि जातींचे लोक होते. ते एक आदर्श राजा होते. तसेच ते सर्वसामान्य रयतेचे राजा होते. एवढंच नाही तर सर्वांनीच त्यांचं नेतृत्व राजा म्हणून स्वीकारलं”, असं अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एस्क्प्रेसने दिलं आहे.

“सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, राजकीय नेत्यांनी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी विधाने करताना काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकि‍र्दीत देखील अनेक मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांच्या मागचा हेतू मला समजेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा पंथाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला नाही”, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

संभाजी भिडे यांनी काय म्हटलं होतं?

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत भूमिका मांडली. मात्र, याचवेळी बोलताना संभाजी भिडे यांनी असा दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला. पण आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक हे चुकीचा इतिहास मांडत आहेत”, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लीम सैनिक नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई मुस्लिमांविरोधात होती”, असं विधान मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली होती.