Ajit Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र, महायुतीत आधी मंत्रि‍पदावरून आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरून धूसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक मोठा दावा केला. त्यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल, तोही शिवसेना शिंदे गटाचा, म्हणजे थेट शिंदेंची शिवसेना फुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं. यानंतर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले होते. मात्र, या दौऱ्यात सर्वात जास्त चर्चा राजकीय भूकंपाच्या रंगल्या. या संदर्भात संजय राऊत यांनी राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल, तोही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार हे धादांत खोटं आहे”, असं मोजक्या शब्दांत अजित पवारांनी उत्तर दिलं.

जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “पोलिसांच्या तपासात असं काही सिद्ध झालं आहे का? कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग आम्हाला विचारलं जातं. दुसऱ्यांनी काय म्हटलं त्याचं आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही कायद्याने आणि नियमाने कारवाई करतो. आता ज्या कोणाकडे काही माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी. मग त्या माहितीची चौकशी केली जाईल. त्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही”, असं अजित पवारांनी म्हटलं.

अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, “सध्याच्या काळात खूप वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक सामग्री उपलब्ध असते, त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आम्ही ड्रोनच्या बाबतीत देखील महत्वाची पावलं उचलली आहेत. तसेच चांगले बियाणे, चांगली खते, तसेच शेती पिकाला खते टाकताना कशाही पद्धतीने खते न टाकणे, पिकाला पाण्याच्या माध्यमातून खते कशी टाकता येतील, तसेच खतांमध्ये बचत कशी होईल अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे”, असं अजित पवारांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar on sanjay rauts statement in will the state get a third deputy chief minister mahayuti politics gkt