Ajit Pawar On Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरात अनेक नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. या माध्यमातून विविध मतदारसंघासह उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. तसेच आपआपल्या पक्ष संघटनेची मोर्चेबांधणी विविध राजकीय नेते मंडळी करताना पाहायला मिळत आहेत. या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचेही राज्यभरात मेळावे सुरु आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी निवडणुकीची रणनीती आखत आहेत.

तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. यातच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांना आव्हान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुतीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपण वेगळी भूमिका घेण्याबाबत शरद पवारांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी आता केला आहे. “शरद पवारांना सांगूनच मी माझी वेगळी भूमिका घेतली”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान, एवढंच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणं ही आपली चूक होती, असा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला.

हेही वाचा : Ajit Pawar : “बारामती विधानसभा अजित पवारच लढणार, दुसरं..”, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

अजित पवार काय म्हणाले?

“मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. मी साहेबांना (शरद पवारांना) सांगून भूमिका घेतली. ते पहिल्यांदा हो म्हणाले. नंतर पुन्हा साहेब (शरद पवार) नाही म्हणाले. मला ते योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण पुढे गेलो. हे सर्व होत असताना तुम्हाला कधीही त्रास झाला नाही. कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो, त्यामुळे काही अडचण नव्हती”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

‘शेवटी कुठे ना कुठे थांबलं पाहिजे’

ते पुढे म्हणाले, “मी काही ठिकाणी सुतोवाच केलं होतं ते तुम्ही पाहिलंही असेल. डॉक्टरांनी देखील मला फोन करून सांगितलं की तुमच्या मनामध्ये काय आहे? मी म्हटलं माझ्या मनामध्ये काही नाही. मात्र, शेवटी प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबावं लागतं”, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं.

‘माझ्याकडून चूक झाली’

“शरद पवारांच्या वयाचा विचार करता सुप्रिया सुळे यांनाच आपण मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता बारामतीकरांनी ठरवलेली होती. त्या मानसिकतेमधून सर्वांनी लोकसभेमध्ये मतदान केलं. शेवटी मतदार प्रमुख असतो, त्यामुळे मतदाराला काय करायचं? हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मला आता जे झालं त्यावर बोलायचं नाही. मी एका ठिकाणी बोललो देखील की, वास्तविक मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार द्यायला नको होता. मात्र, माझ्याकडून चूक झाली. आता जी चूक झाली ती मी मान्य केली”, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.