DCM Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात दौऱ्यांचा धडाका लावला आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांचे दौरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी आणि जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका सध्या महायुती आणि आघाडीमध्ये सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. यातच महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टीका टिप्पणीमुळे धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं. “राष्ट्रवादीबरोबर आपलं कधीही पटलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात”, असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचाही इशारा दिला होता. दरम्यान, या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “मला बाकीचं काहीही बोलायचं नाही. माझ्यापुरतं बोला. कोण काय बोललं याबाबत मला काहीही देणंघेणं नाही “, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावर अधिक बोलणं टाळलं.

हेही वाचा : Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य

“अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मला बाकीचं काहीही बोलायचं नाही. मला माझ्यापुरतं बोला. याने असं केलं किंवा त्यांने असं केलं, याबाबत मला काहीही देणंघेणं नाही. मी सुरवातीला ठरवलेलं आहे की, कोणावरही टीका करायचं नाही. मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला छिद्र पडत नाहीत. माझं काम सुरु आहे. मी कामाचा माणूस आहे. मी लोकांचे कामं करतो. आज चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

मंत्री तानाजी सावंत काय म्हणाले होते?

शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जात आहे. तानाजी सावंत म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेसशी आपलं आयुष्यभर पटलं नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात”, असं विधान तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.