टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने या विजयासह १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. या पार्श्वभीमीवर मुंबईत भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या अखेरच्या षटकातील त्या कॅचची चर्चा आहे.

यासंदर्भात बोलताना रोहित शर्माने या विधीमंडळातील वक्तव्यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या झेलवर एक वक्तव्य केलं. “सूर्याने आता सांगितलं की बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता.”, असं रोहित शर्माने वक्तव्य केलं. रोहित शर्माच्या या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “रोहितनं सांगितलं की, कॅच नसता घेतला तर तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं”, असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलं.

हेही वाचा : ‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप…’, हार्दिक पंड्या पंतप्रधान मोदींशी बोलताना झाला भावुक, पाहा VIDEO

अजित पवार काय म्हणाले?

“मागच्या काळात अनेकांनी क्रिकेटमध्ये काम करताना महेंद्रसिंग धोनीसह अनेकांनी यश मिळवण्याचं काम केलं. मात्र, असा विधिमंडळामध्ये दिमागदार कार्यक्रम कधी झाला नव्हता. हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. क्रिकेटचा जो अंतिम सामना झाला, त्यावेळी ३० बॉल आणि ३० धावा बाकी होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ज्या प्रकारे खेळत होते ते पाहून कितीतरी क्रिकेटच्या चाहत्यांनी आशा सोडली होती. मात्र, कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी चमत्कार घडेल. अखेर तो चमत्कार घडला”, असं अजित पवार म्हणाले.

“पहिल्या सामन्यापासून आपण यश मिळवत गेलो. प्रत्येक खेळाडूने अतिशय चांगल्याप्रमाणे खेळ दाखवला. रोहित शर्मा चांगलं खेळत होता. त्यानंतर विराट कोहली पुढे आला आणि विराटची बॅट तळपली. तसेच शिवम दुबे, अक्षर पटेलची बॅट तळपली. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे चांगले खेळले. आपले क्रिकेट प्रेमी हे आगळेवेगळे आहेत. मरिन ड्राईव्ह परिसरात गेल्या ३० ते ३४ वर्षात एवढी मोठी गर्दी कधी पाहिली नव्हती. एवढी मोठी गर्दी काल आपण पाहिली. सर्व भारतीय क्रिकेटवर जेवढं प्रेम करतात ते जगात कुठेही पाहायला मिळत नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, “रोहित शर्मा, सूर्य कुमार यादवचे कौतुक करतो. कारण ज्या प्रकारे सूर्यकुमारने कॅच घेतला. त्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळे सूर्यकुमार यादवचं कौतुक करतो. संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. पण अप्रतिम असा झेल तू घेतला. रोहितने सांगितलं की, झेल तू घेतला नसता तर मी बघितलं असतं. पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं तर आम्ही सर्वांनी बघितलं असतं”, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली.