कराड : बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर करताना, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात आणि दिल्लीतही वेगळे स्थान निर्माण करणारे माजी उपपंतप्रधान, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच वाटचाल करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर प्रथमच आलेले अजित पवार यांनी कराडमध्ये कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
हेही वाचा >>> “एका शासकीय कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे ३-३ कर्मचारी काम करू शकतात” – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, सुसंस्कृत राजकारण कसे असावे, सर्व जाती-धर्माच्या लोकांना कसा न्याय द्यावा, याचे उत्तम उदाहरण संयुक्त महाराष्ट्राचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांसमोर घालून दिले. त्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांती, सहकाराच्या विस्तारीकरणाचा पाया घातला. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर झाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वेगळे स्थान चव्हाण साहेबांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो आहोत.
हेही वाचा >>> तुळशीबाग गणपती आता जाणार सातासमुद्रापार,जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळात होणार प्रतिष्ठापना
आत्मक्लेशाची आवर्जून आठवण
याआधीही एकदा चुकीचे वक्तव्य आपल्याकडून झाल्यानंतर आपण आत्मक्लेश करण्यासाठी समाधीस्थळी बसून होतो. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणार असल्याचे अजित पवारांनी या वेळी आवर्जून सांगितले.
हेही वाचा >>> “देवेंद्र फडणवीस हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
समर्थकांची हजेरी
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरुगडे-पाटील, अॅड. राजेंद्र पाटील-उंडाळकर, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे, युवराज सूर्यवंशी, विजय यादव, सादिक इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपकडूनही स्वागत
दरम्यान, कराडच्या प्रवेशद्वारावरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले. या वेळी माजी आमदार आनंदराव पाटील, त्यांचे पुत्र मानसिंग पाटील, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, हर्षवर्धन मोहिते, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते आदींनी अजित पवारांचे स्वागत केले.