मोहनीराज लहाडे, लोकसत्ता
शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरात सर्वच वक्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. त्यांचा गद्दार असा उल्लेख करत, त्यांच्या गटाच्या आमदार-खासदारांना निवडणुकीत जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे गुरुवारी समारोपप्रसंगी होणार आहेत.
‘ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची’ असे घोषवाक्य ठेवण्यात आल्याने शिबिराचा रोख अगोदरच स्पष्ट झाला होता. तोच धागा पकडून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी अजित पवार, सुनील तटकरे यांना लक्ष्य केले.
प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी नव्या वर्षांत आता नव्याने सुरुवात करायची आहे, असे आवाहन करत आगामी काळ संघर्षांचा असल्याचे सुरुवातीसच स्पष्ट केले.
हेही वाचा >>> जात प्रमाणपत्रासाठी पुरावा सादर करणे सुलभ; सध्याच्या ११ ऐवजी २३ कागदपत्रे ग्राह्य
रोहित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा
शिबिरास आमदार रोहित पवार अनुपस्थितीत राहिल्याने त्याची चर्चा सुरू होती. त्यांच्या अनुपस्थितीबाबत नेत्यांकडूनही वेगवेगळी कारणे दिली गेल्याने या गोंधळात भर पडली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार कुटुंबासमवेत परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगितले. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना कावीळ झाल्याचे कारण दिले.
पक्ष ध्वज, चिन्हाचे पूजन
शिबिराच्या सुरुवातीस ध्वजाचे पूजन व वंदन करण्यात आले. यासंदर्भात पत्रकारांकडे स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, मूळ पक्ष आमच्याबरोबर आहे. आमदार गेले म्हणून पक्ष जात नाही, पक्ष आपल्या जागी असतो. आम्ही निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली आहे.
८ आमदारांची उपस्थिती
शिबिरास अध्यक्ष शरद पवार दिवसभर होते. याशिवाय सुप्रिया सुळे, फौजिया खान, अमोल कोल्हे हे खासदार तर जयंत पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार, बाळासाहेब पाटील, अरुण लाड, संदीप क्षीरसागर, प्राजक्त तनपुरे, जितेंद्र आव्हाड हे आमदार उपस्थित होते.
मला कोणत्याही धार्मिक स्थळी जायला परवानगी लागत नाही. ‘राम कृष्ण हरी’ हा आमचा संप्रदाय असल्याने श्रीराम ही कोणाची मक्तेदारी नाही. आजचा भाजप हा ‘भ्रष्ट जुलमी पार्टी’ झाली आहे.
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
‘अजित पवारांना २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री करणे चूक’
* शिर्डी : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादागिरी आम्ही शरद पवार यांच्यामुळेच सहन केली. आता त्यांना परतीच्या वाटा बंद करून टाका. २०१९ मध्ये परत आल्यावर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करणे ही मोठी चूक होती, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
’ निवडणुका आल्या की रामाचे नाव घेऊन महाराष्ट्र अस्वस्थ केला जातो. तणाव निर्माण केला जातो. आताही रामाचे नाव घेऊन निमंत्रण देणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
* राम शाकाहारी नसून मांसाहारी असल्याचे विधानही या वेळी आव्हाड यांनी केले. * मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, तरीही ते शब्द कसा देतात? ओबीसींना कायद्याने संरक्षण दिलेले आहे. मग अशा परिस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांना बोलायला कोण भाग पाडत आहे, त्यांना बोलायला भाग पाडून गावोगाव आग लावली जात आहे.