अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ इतर आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी फूट ठरली. आता अजित पवारांसह पक्षाचे ४० आमदार असल्याचे दावे केले जात आहेत. या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, सध्या चालू असणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात एका वेगळ्याच कारणामुळे काका अजित पवार पुतण्या रोहित पवारांवर नाराज झाल्याचं दिसून आलं. यासंदर्भात थेट अधिवेशनात बोलताना अजित पवारांनी भूमिका मांडली.
नेमकं काय घडलं?
आमदार रोहित पवार आज सकाळपासून विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी, या मागणीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केलं होतं. विधानसभेतही या मुद्द्यावर चर्चा झाली. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.
विधानसभेत काय झालं?
एकीकडे विधानभवनाबाहेर रोहित पवार आंदोलनाला बसले असताना दुसरीकडे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख रोहित पवारांची बाजू विधानसभेत मांडत होते. “रोहित पवारांनी एमआयडीसीच्या स्थापनेची मागणी गेल्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. तेव्हा उदय सामंतांनी अधिवेशन संपण्याआधी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता दुसरं अधिवेशन आलं. तरी अजूनही तो आदेश निघालेला नाही. त्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्याची शासनानं दखल घ्यावी”, असं अनिल देशमुख म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी दिली समज
दरम्यान, यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आंदोलनावरून विरोधकांना समज दिली. “त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या पायऱ्यांवर आंदोलन करायचं नाही हा निर्णय सभागृहात एकमताने झाला होता. त्याबाबत आम्ही रोहित पवारांना आवाहन केलं आहे. माझी विनंती आहे की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी त्यांची समजूत घालावी. रोहित पवारांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
निधीवाटपावरून सभागृहात खडाजंगी, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मला दुर्दैवाने इतिहासात…
दरम्यान, या मुद्द्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “अनिल देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत (रोहित पवार) एक मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भातल्या एका पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ ला रोहित पवारांना पत्र दिलं आहे. या पावसाळी अधिवेशनात संबंधितांसमवेत बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असं पत्र उदय सामंतांनी दिलं. मंत्रीमहोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही. एकच आठवडा झालेला आहे. आत्ताच दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही”, असं अजित पवार यावेळी उत्तरात म्हणाले.
उदय सामंतांचं आश्वासन
दरम्यान, “उद्योग विभागामार्फत कर्जतमध्ये एमआयडीसी होण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन मी दिलं आहे. यासंदर्भातल्या अधिसूचनेसाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. त्यासाठी तातडीने पावलं उचलली जातील”, असं आश्वासन उदय सामंत यांनी रोहित पवारांना दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.