NDA Meeting : संसदेतील धक्काबुकीची घटना तसेच, डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने उठवलेले रान अशा संवेदनशील मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत ‘तेलगु देसम’चे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जनता दल (सं)चे नेते राजीव रंजन सिंह, अपना दलच्या (एस) अध्यक्ष अनुप्रिया पटेल, जनता दल (ध) नेते एच. डी. कुमारस्वामी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (एस) नेते जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, तर महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रतापराव जाधव आदी नेते उपस्थित होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
u
“काल एनडीएची बैठक होती. पण सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते. याविषयी त्यांनीही सांगितलं. त्यामुळे ते बैठकीला आले नाहीत म्हणून त्याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. आमच्याकडून प्रतापराव जाधव उपस्थित होते”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “एनडीए मजबूत आहे, एनडीए एका विचाराने एकत्र आलेली युती आहे. स्वार्थ भावनेने एकत्र आलेले इंडिया आघाडी नाहीय. एनडीएतील सर्व पक्ष विकासाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए अधिक मजबूत होत जात आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
काँग्रेसच्या नकारात्मक विचारांना प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे शहांनी सांगितल्याची माहिती निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२५ डिसेंबर) ही बैठक आयोजित करण्यात आली होती. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे पहिले सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. सुशासन हा वाजपेयी सरकारचा प्रमुख विषय होता. आता मोदींच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चे सलग तिसरा सरकारचा कार्यकाळ यशस्वी करण्यासाठी देखील सुशासन हाच प्रमुख मुद्दा असेल. या बैठकीची नेमकी विषयपत्रिका स्पष्ट करण्यात आली नसला तरी, ‘एनडीए’मध्ये समन्वय व सुप्रशासनावर अधिक भर यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते.