Jay Pawar Engagment : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचा धाकटा पुत्र जय पवार यांचा काल (१० एप्रिल) ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल पवार कुटुंब एकत्र आले होते. सुप्रिया सुळे आणि जय पवार यांनी काही कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सुप्रिया सुळेंसह कुटुंबातील अनेकजण उपस्थित होते, असं स्पष्ट दिसतंय. तर शरद पवारांच्या एन्ट्रीचीही चर्चा सुरू आहे.

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्यानंतर पवार कुटुंबात वितुष्ट निर्माण झालं होतं. दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाल्याने सार्वजनिक ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार कुटुंबाने एकत्र येणं टाळलं होतं. त्यातच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी एकमेकांवर तुफान टोलेबाजी केली होती. यामुळे राजकीय मतभेद टोकाला पोहोचले होते.

आम्ही जाऊ, इतरांचं माहीत नाही

दरम्यान, दोन्ही कुटुंबातील वितुष्ट संपून पुन्हा ते एकत्र येतील की नाही याबाबतीत शंका व्यक्त केली जात असतानाच पवार कुटुंबात आता सनई चौघडे वाजणार आहेत. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र दिसायला लागले आहेत. काल झालेल्या साखरपुड्यात पवार कुटुंबातील अनेकजण एकत्र दिसले. मात्र, शरद पवार एकाही फोटोत दिसले नाहीत. दरम्यान, साखरपुड्याला जाण्याआधी सुप्रिया सुळेंना याबाबत विचारण्यातही आलं होतं. शरद पवार या कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, “मी, सदानंद सुळे आणि रेवती सुळे या कार्यक्रमाला जाणार आहोत. मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. इतर कोणाचं माहीत नाही.” त्यामुळे शरद पवारांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाली होती.

शरद पवारांची एन्ट्री अन्…

दरम्यान, काल सायंकाळी जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटोआणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यानुसार शरद पवारांनी आपल्या नातवाच्या साखरपुड्याला हजेरी लावलेली दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना आणायला खुद्द अजित पवार गेटपर्यंत गेले होते. अजित पवार, पार्थ पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनीही या शाही सोहळ्यातील कौटुंबिक फोटो शेअर केले असून यामध्ये पवार कुटुंबातील अनेक मंडळी एकत्र दिसत आहेत.

पार्थ पवार, जय पवार, होणाऱ्या सूनबाई ऋतुजा पाटील आणि सुप्रिया सुळे असा एकत्र कौटुंबिक फोटोही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने राजकीय मतभेद दूर सारून पवार कुटुंब एकत्र आल्याचे म्हटलं जातंय. याबाबत सुप्रिया सुळे यांनी बोलकी प्रतिक्रियाही दिली आहे.

एक आनंदाची संध्याकाळ अनुभवली – सुप्रिया सुळे

“कुटुंबातील गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि कुटुंबात गल्लत कोणीच करू नये. जय आणि ऋतूचा काल साखरपुडा सोहळा पार पडला. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात एक लेक येतेय. त्या पुढे म्हणाल्या, “कालच्या सोहळ्यात सर्वांत ज्येष्ठ आशा काकी, सुमती काकू खास हंपीवरून आल्या होत्या. सर्वच होते. मध्यंतरी आमच्या घरात एक दुर्दैवी घटना झाली की आमच्या भारती काकी गेल्या. त्या गेल्यानंतर त्यातून आमचं कुटुंब सावरत होतं. त्याच काळात हा साखरपुडा झाला. त्यामुळे या अडचणीच्या काळातून, दुःखाच्या काळातून जात असताना एक आनंदाची संध्याकाळ आमच्या कुटुंबाला मिळाली”, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.