महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत.
पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. प्रथम श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तसेच, गेली ५० वर्षे वारी करणाऱ्या माधवराव साळुंखे ( वय, ५८ ) आणि कलावती माधवराव साळुंखे ( वय, ५५ रा. शिरोडी खुर्द, फुलोंबी, जि. औरंगाबाद ) या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला आहे.
आषाढी आणि कार्तिकी शासकीय महापूजेचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले राजकारणी ठरले. २०१४ ते २०१९ या काळात एक वर्षाचा अपवाद वगळता फडणवीस यांनी चार वेळा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली आहे. त्यात, २०१८ मध्ये मराठा आंदोलनामुळे फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर आषाढीची महापूजा केली.
दरम्यान, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावे लागले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून २०२० आणि २०२१ मध्ये श्री. विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर, महाविकास सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना दोन वेळा कार्तिकीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
अडीच वर्षानंतर राज्यात सत्तापालट झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यंदाच्या आषाढीला श्री. विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर आता कार्तिकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक शासकीय महापूजा केली आहे.