कराड : सेंद्रिय आणि विषमुक्त शेती काळाची गरज असून, सेंद्रिय शेतीमालाची जगाची मागणी आहे. तरी, शेतकऱ्यांनी शेतीचे विज्ञान नव्याने समजून घ्यावे, प्रगत तंत्रज्ञानातून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीच करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सातारा जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात  नावालाही दुष्काळ राहणार नसल्याची ठाम ग्वाही त्यांनी  दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> साखर कारखानदारीवरून देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “सत्तेत होते तेव्हा…”

कृष्णा साखर कारखान्याच्या कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्याने कराडच्या शिवाजी क्रीडांगणावर आयोजित पाच दिवसीय भव्य कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी व  औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते तर, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर, खासदार उदयनराजे भोसले,आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, कृष्णा बँकेचे अध्यक्ष व महोत्सवाचे प्रमुख निमंत्रक डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, भाजप नेते रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, चित्रलेखा माने-कदम, एकनाथ बागडी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस व उदयनराजे भोसले यांना बैलगाडीतून वाजत-गाजत प्रदर्शनस्थळी आणण्यात आले.

हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदींचंही वय झालं, अजित पवार त्यांना…”; वयोमानावरुन नाना पटोले यांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिला विज्ञानिक हा शेतकरीच. त्याने शास्त्रशुध्द पध्दतीने अन्नधान्याच सोनं पिकवलं. पण, पुढे उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, औषधांचा अतिवापर होत गेल्याने शेतीक्षेत्र क्षारपड होताना, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे सेंद्रिय शेतीला महत्व आले आहे. तरी पाणी, खताच्या वापराचे विज्ञान नव्याने समजून घेण्याची आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शनासाठी अशा कृषी प्रदर्शनांची गरज आहे.

कृष्णाचा वटवृक्ष उपकृत झाला

‘कृष्णा’च्या महोत्सवाने इथे शेती व उद्योग हातात घालून चालतात हे दाखवून दिले. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा उद्योग समुहाचा लावलेला वटवृक्ष उपकृत झाला आहे.

त्यांनीं पाणी योजना रखडवल्या

आम्ही पाण्याचे सुयोग्य फेरनियोजन करून, ज्या – त्या ठिकाणींच्या सिंचन प्रकल्पांचे पाणी ज्या लोकांना कधी पाणी मिळाले नव्हते त्यांना न्याय दिला. पूर्वीच्या सरकारने रखडवलेल्या योजनांना आम्ही चालना दिली असून, शेती, सिंचनासाठी वाट्टेल तेवढा निधी दिला जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

शिवाजी क्रीडांगण प्रगत, प्रशस्त करू

डॉ. अतुल भोसले यांनी या शिवाजी क्रिडांगणाला प्रशस्त व आधुनिक करण्याची मागणी केली आहे. तरी या क्रीडांगणाचा संपूर्ण आराखडा बनवून प्रशस्त, आधुनिक क्रीडांगण साकारले जाईल अशीही ग्वाही फडणवीस यांनी दिली.

उदयनराजेंनी मला आपल्या संघात ठेवावे!

उदयनराजे आपण कर्णधार आहात तरी, मला संघातून बाहेर ठेवू नका असे म्हणाले असलेतरी हा संघ ‘आयपीएल’चा असून, त्याचे मालक महाराजच असल्याने कोणाला संघात आणि बाहेर ठेवायचे हे त्यांनीच ठरवायचे असून, त्यांनी आम्हाला त्यांच्या संघात ठेवावे म्हणजे झाले अशी मिश्कील टिपणी फडणवीस यांनी केली.

शरद पवारांवर निशाणा

साखर कारखानदारीचे नेतृत्व करणारे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगातील काय कळते म्हणत होते. पण, मोदींनी साखर उद्योगासाठी घेतलेले निर्णय सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखे आहेत. पण, मोदींवर टीका करणारे सत्तेत होते त्यावेळी असे निर्णय ते घेऊ शकले नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत साधला.

मुंबईत मोकाट रेडे

फडणवीस म्हणाले, महोत्सवात मी ४२ लाखांचा बैल आणि इलेक्ट्रिक बैलही पाहिला. तरी मला विनंती करायची आहे की, मुंबईमध्ये रेडे मोकाट सुटलेत, ते दूरदर्शनवर इतके बोलतात की बास. तरी त्यांचा बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे काही योजना, तंत्रज्ञान इथे आले आहे का? असेल तर आम्हाला शिकावा.

देवेंद्रजींनी राज्याचे नेतृत्व करावे- उदयनराजे

उदयनराजे म्हणाले, देवेंद्रजी आणि मी महोत्सवस्थळी बैलगाडीतून येताना पकडलेल्या कासऱ्याप्रमाणे राज्याच्या कारभाराचा कासराही फडणवीस यांना धरावा लागेल. असे सांगत महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावे, अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली. दगडाला शेंदूर फासून कोणालाही निवडून आणू हा काँग्रेसचा अहंकार आता मोडीत निघाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व सातारा जिल्हा आता काँग्रेसजणांचा  राहिलेला नसून, तो महायुतीचा बालेकिल्ला झाल्याचे खासदार भोसले म्हणाले.

केंद्रामुळे साखर उद्योगाला उभारी- डॉ. सुरेश भोसले

डॉ. सुरेश भोसले यांनी केंद्र शासनाच्या धोरणांमुळे साखर उद्योगाला कशी उभारी मिळाली हे सविस्तर सांगितले. नरेंद्र मोदी सरकारने विशेषतः प्राप्तिकर रद्द करून, साखर कारखानदारीला मोठा दिलासा दिला. शेतमालाला मिळालेली आधारभूत किंमत (एम.एस.पी.) आणि इंधनात इथेनॉल मिश्रणाचा निर्णय यामुळे साखर उद्योगाला चालना मिळाली आहे. डॉ. अतुल भोसले म्हणाले, शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, नवनवीन उत्पादने देश-विदेशात पोहोचवण्यासाठी कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी व औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आले असून, त्याचा शेतकरी व उद्योजकांना मोठा फायदा  होईल. शिवाजी क्रिडांगणाला उर्जितावस्था आणण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी  मागणी डॉ. अतुल भोसले यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis appeal farmers to do organic and poison free farming zws