महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण उद्धव ठाकरे हे उत्तर मध्य मुंबईत राहतात. आता या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे गेली आहे. याच संदर्भाने बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांना म्हणजे काँग्रेसला मतदान करणार असल्याचा उल्लेख केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामगार दिनानिमित्त मुंबईत बोलत होते. “मी काँग्रेसचा मतदार हे उद्धव ठाकरे म्हणाल्याचं ऐकून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल”, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीही होऊ देणार नाही आणि तशी वेळ आळी तर माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन. मात्र, आता त्यांचेच चिरंजीव काँग्रेसला मतदान करणार आहेत. उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद मी पाहत होते. त्यामध्ये ते हसून सांगत होते की, उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. आता हे ऐकून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा : कोल्हापुरातून शरद पवारांचा मोदींना थेट इशारा, “महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”

ते पुढे म्हणाले, “खरं म्हणजे खुर्चीसाठी ऱ्हास झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव एकीकडे घ्यायचे आणि त्यांच्या विचाराशी प्रातरणा करायची. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील. पण विचाराचे मालक हे एकनाथ शिंदेच आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आपण महाराष्ट्राचा विकास पाहात आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात देशाच्या एकूण जीडीपी पैकी १५ टक्के जीडीपी तयार होतो. देशातील एकूण वस्तु, उत्पादनामध्ये २० टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. मात्र, उद्धव ठाकरे हे चुकीच्या गोष्टी सांगतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चालले आहेत, असे ते सांगतात. पण खरे म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या चलेचपाट्यांना माहिती नाही. ज्यावेळी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार आले. २०१५ पासून २०१९ पर्यंत पंतप्रधान मोदी यांचा आशीर्वाद असल्यामुळे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis criticizes to shivsena uddhav thackeray and mahavikas aghadi gkt