पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्गे जोडणाऱ्या अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र याच अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज थेट अटल सेतूवर जाऊन रस्त्याची दुरवस्था दाखवली. तसेच काही फोटो शेअर करत रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्याचं म्हटलं. मात्र, यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “अटल सेतूला कोणताही धोका नसून कोणताही तडा गेलेला नाही. मात्र, काँग्रेसने खोट्याचा आधार घेऊन ‘दरार’ निर्माण करण्याची योजना आखली असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“अटल सेतूला कोणताही तडा गेलेला नाही. अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र जवळच्या रस्त्याचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस पक्षाने खोट्याचा आधार घेऊन एक लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक करण्याचा आरोप आणि आता अशा खोट्या अफवा. मात्र, देशातील जनताच या ‘दरार’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूला तडे; नाना पटोलेंनी समोर आणली दुरवस्था

अटल सेतूच्या प्रकल्पाचे प्रमुख काय म्हणाले?

अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज थेट अटल सेतूवर जाऊन रस्त्याची दुरवस्था दाखवली होती. त्यानंतर आता अटल सेतू प्रकल्पाचे प्रमुख कैलाश गणतारा यांनी म्हटलं की, “हा सर्व्हिस रोड आहे. हा रोड अटल सेतूच्या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. अटल सेतूच्या रस्त्याला तडे गेलेले नाहीत. मात्र, तडे गेल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत”, असं स्पष्टीकरण कैलाश गणतारा यांनी दिलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले होते?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज थेट अटल सेतूवर जाऊन या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “काँग्रेसकडून आज आम्ही राज्यभर महायुतीवर चिखलफेक करत आहोत. त्याप्रमाणेच जनतेनेही या भ्रष्टाचारी सरकारवर आज चिखलफेक केली पाहीजे. भ्रष्टाचार हाच एकमेव अजेंडा या सरकारचा दिसतो”, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच बँकांकडून मोठी कर्ज काढून सरकार रस्तेबांधणी करते. जनतेची संपत्ती गहाण ठेवून कर्ज काढली जातात. मात्र लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला होता.

Story img Loader