महाराष्ट्रात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपाने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा अगदी थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांनाही संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १२ जुलैच्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली याचा आनंदच आहे
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजपा केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी केंद्रीय समितीचेही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांची मागणी, “राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे, त्यांनी आता लोकसभेत…”
पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक हरल्या
पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३० जागा मिळाल्या. तर महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं. ज्या जागा पडल्या त्यातली एक जागा पंकजा मुंडे यांचीही होती. त्याआधी म्हणजेच २०१९ मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीतही त्यांना संधी देण्यात आली होती. पण त्यांचा भाऊ धनंजय मुंडे यांनीच त्यांना हरवलं. २०२३ मध्ये अजित पवारही महायुतीत आले. त्यांच्यासह धनंजय मुंडेही महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला भावा-बहिणीचा संघर्षही मिटला होता. पण तरीही त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. आता पंकजा मुंडेंना विधानस परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
हे पण वाचा- मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
राहुल गांधींवर जोरदार टीका
पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यानंतर राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले, हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पालखी सोहळ्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि पंढरीची वारी ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेला एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातला आनंदाचाच क्षण असतो. तोच आनंद अनुभवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. मला विश्वास आहे,जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहेत,तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच फडकत राहिल आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडीत राहील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.