खासदार संजय राऊत यांचं पत्र सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का? असा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणं अतिशय चूक आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्यापेक्षाही चूक आहे. संजय राऊत असोत की कुणी असो कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता नक्की आहे का? त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे का? यासंदर्भातली सगळी कारवाई ही आपल्याकडे गुप्तचर विभागातर्फे केली जाईल. कुणालाही सुरक्षा देण्याचं काम एक समिती करते. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती काम करते. आम्ही त्यांचं पत्र कमिटीकडे पाठवत आहोत. या संदर्भात आपण कधीही महाराष्ट्रात राजकारण करत नाही असं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आवश्यक असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे
संजय राऊत इतके बिनडोकपणाचे आरोप करतात की
संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचं. २ हजार कोटींचा आरोप केला. एक पुरावा त्यांच्याजवळ नाही. अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं मला वाटतं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भीमाशंकर वादावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भीमाशंकर जे लोकं बोलत आहेत ते महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. कुणाच्याही मनात याबद्दल वाद नाही. ज्या लोकांकडे विषय नाहीत ते असले विषय उभे करत आहेत. भीमाशंकर हे महाराष्ट्रात आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. कुणी काय जाहिरात दिली कुणी काय म्हटलं यामुळे त्यात बदल होणार नाही. उद्या मी जर म्हटलं की कामाख्या मंदिर हे गुवाहाटीला नाही तर महाराष्ट्रात आहे तर असं म्हटल्याने ते मंदिर महाराष्ट्रात येणार आहे का? जे लोक बोलत आहेत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही. कुणाच्याही मनात भीमाशंकरचा वाद नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांचा आरोप काय?
संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. यामध्ये संजय राऊत म्हणतात, “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधींना सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. पण एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहाता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे”, असं राऊतांनी पत्रात नमूद केलं आहे.