“बारामती येथे उद्योगांना बोलवून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांना एक नवा उद्योग मिळाला आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले. त्यामुळे त्यांनी आमच्या मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एखादे चांगले काम करायचे असेल तर महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे, ज्याचे अनुकरण सर्वच करतात. आज या मंचावरून हे दिसून येतं. आम्ही सर्व मिळून चांगली कामं करू शकतो. आजच्या मेळाव्यातून ५५ हजार पदे देण्यात येणार आहेत. उद्योगांना मोठ्या प्रमाणात मानव संसाधनांची आवश्यकता आहे. दुसरीकडे तरुणांना रोजगाराची गरज आहे. त्यामुळे या दोघांना एकत्रित आणण्याची गरज होती. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील महारोजगार मेळाव्यात व्यक्त केली.

आम्ही कंत्राटी कामगार – फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही राजकारणात काम करणारी मंडळी कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर पाच वर्षांनी कंत्राटाचे नूतनीकरण करावे लागते. चांगले काम केले तर जनता आमच्या कंत्राटाचे नूतनीकरण करते आणि चांगले काम केले नसेल तर लोक आम्हाला घरी बसवितात. पण चांगले काम केले तर जन्मभर प्रगती होत असते. आज बारामती येथे होत असलेल्या मेळाव्यात ५५ हजार पदे आहेत आणि फक्त ३६ हजार अर्ज आले आहेत. उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील, अशी अपेक्षा आहे.

“अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरा-समोर आले आणि…”, पुढं काय झालं?

अजित पवारांना गृहमंत्रीपद देणार नाही

बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीमधील विविध विकासकामांचेही लोकार्पण करण्यात आले. बारामती एसटी बस स्टँड, नवे पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय आणि पोलीस गृहसंकूलाचे उदघाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व कामांचे कौतुक केले. “हे सरकारी बांधकाम वाटतच नाही. बस स्टँड तर विमानतळ असल्याप्रमाणे विकसित केले आहे. पोलीस उपमुख्यालय तर एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयासारखे बांधले आहे”, अशा शब्दांत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशंसा केली.

“आता पोलीस बारामतीमध्ये पोस्टींग द्या, यासाठी माझ्या मागे लागतील. यानिमित्ताने मी अजित पवारांना विनंती करू इच्छितो की, पोलीसांच्या निवासांचे बांधकाम करण्यासाठी अजित पवारांनाच पीएमसी (Project Management Consultant) बनवून टाकतो, म्हणजे राज्यभरात सगळीकडेच अशाच चांगल्या इमारती होतील. अर्थात अजित पवार माझ्याकडे गृहखाते मागू शकतात. पण मी हे खाते त्यांना देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवील”, अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Story img Loader