कराड : साखर कारखानदारीचे नेतृत्व करणारे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगातील काय कळते असे म्हणत होते. पण, मोदींनी साखर उद्योगासाठी घेतलेले निर्णय सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहेत. पण, मोदींवर टीका करणारे सत्तेत होते त्या वेळी ते केवळ शांत बसले. त्यांनी असे हिताचे निर्णय घेतले नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत साधला.
हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदींचंही वय झालं, अजित पवार त्यांना…”; वयोमानावरुन नाना पटोले यांची खोचक टीका
कराड येथे आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवारांवर टीका करत फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांना शेतीतील, साखर उद्योगातील काय कळते, असे उपहासाने म्हणत त्यांच्यावर टीका करण्याचे काम या स्वत:ला साखर कारखानदारीचे नेते म्हणवणाऱ्या व्यक्तीने केले. मात्र याच साखर कारखानदारीबाबत गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर एक नजर टाकली, तरी मोदी यांची समज त्यांना कळून येईल. साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यास ही वरील रक्कम नफा समजून त्यावर प्राप्तिकर आकारणी झालेली होती. या करामुळे साखर कारखानदारीपुढे संकट निर्माण झाले होते. याची जाणीव होताच केंद्राने हा प्राप्तिकर रद्द केला. इंधनात इथेनॉल वापराचे धोरण सुरू केल्यामुळे देशांतर्गत इथेनॉलला मोठी मागणी तयार झाली. याचा फायदा साखर कारखान्यांना, परिणामी शेतकऱ्यांना होत आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास मोदी यांच्याच कार्यकाळात सुरुवात झाली आहे. शेतकरी, त्याचा कारखाना टिकला पाहिजे यासाठी ही पावले होती. यांना शेतीतील, साखर उद्योगातील काय कळते, असे उपहासाने चिडवले गेलेल्यांनी हे निर्णय घेतले आहेत. असे चिडवणारे ज्या वेळी सत्तेत होते त्या वेळी त्यांनी असे शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय न घेता शांत बसणे पसंत केले. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या याच नेत्यांनी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पही रखडवले. आता आम्ही हे प्रकल्प पूर्ण करीत असल्याचे सांगत दुष्काळाचा दोष त्यांनी काँग्रेसजनांच्या माथी मारला.
मुंबईतील मोकाट रेडे
कृषी महोत्सवाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, की या महोत्सवात मी ४२ लाखांचा बैल आणि इलेक्ट्रिक बैलही पाहिला. हे पाहिल्यावर मला विनंती करायची आहे, की मुंबईमध्ये अनेक रेडे सध्या मोकाट सुटलेत. ते वाहिन्यांवर इतके बेताल वागतात, की ते माणूस आहेत की रेडे असा प्रश्न पडतो. या रेड्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना, तंत्रज्ञान या महोत्सवात असेल तर सांगा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.