देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत. देवेंद्र फडणवीस आंतरवाली बेचिराख करायची होती. महाराष्ट्र बेचिराख करायचा होता. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मराठ्याविषयी खुनशीपणा आहे. त्यामुळेच बंदूक घेतलेला फोटो पोस्ट केला होता असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच मी जी वक्तव्य फडणवीसांबाबत केली त्यापासून मी अजिबात मागे हटणार नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहेत. ते आमच्या विरोधात जोपर्यंत अशी कामं करत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांना हेच म्हणणार. देवेंद्र फडणवीस चुकीचं वागले आहेत. आंतरवालीतले गुन्हे जाणीवपूर्वक मागे घेतलेले नाहीत. महाराष्ट्रातले गुन्हेही जाणीवपूर्वक मागे घेतलेले नाहीत. संचारबंदी लावायला काय घडलं होतं? कापाकापी झाली होती का? असाही प्रश्न जरांगेंनी विचारला आहे. दंगलग्रस्त परिस्थिती किंवा पाकिस्तानचे दहशतवादी तिथे सापडले आहेत का? रात्रीतून संचारबंदी लावण्याचं कारणच काय? संकलन कसलं करता? काय करायचं ते करा माननीय न्यायालय आम्हाला न्याय देईल. आम्ही थेट न्यायालयात जाऊ असंही मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीसांच्या मनात खुनशीपणा आहे तोच बाहेर येतो आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सोमवारी गृहमंत्र्यांची जबाबदारी होती. पाच हजार महिला, २० ते २५ हजार तिथे होते. त्यादिवशी आम्ही पुढे सरकलो असो आणि महिलांवर लाठीचार्ज झाला असता तर? सगळं राज्य बेचिराख झालं असतं. आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. हे कसलं मराठा आरक्षण आहे? १० टक्के आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले. आता लोकांनी काय मरायचं का? तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे. देवेंद्र फडणवीस या लढाईत जिंकणार नाहीत. माझं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंशी भांडण नाही. आमचे गुन्हे मागे घ्या, जीआर काढले आहेत त्या वचनाला जागा. सहा महिने झाले तरीही तुम्ही अंमलबजावणी करत नाही मग मी काय चुकीचं केलं?
मायबाप मराठ्यांवर माझी निष्ठा आहे. मी माझ्या समाजासाठी बोलतो आहे. मी फटकळपणे बोलतोय असं वाटत असेल तर माझ्या समाजाच्या विरोधात कुणी गेलं तर मी बोलणारच. मी गोर-गरीब मराठ्यांशी लढतो आहे. तुमची सत्ता येण्यासाठी मी समाजाचं वाटोळं करायचं का? देवेंद्र फडणवीसांनी मराठा आमदारांची बैठक घेतली आहे. गैरसमज पसरवण्यासाठीच ही बैठक घेण्यात आली. तुमचं ऐकून कुणीही तुमच्या मागे पळणार नाही हे लक्षात घ्या. जे काही आपल्याशी बोलायला येणार आहे त्यांच्यापुढे नाईलाज आहे म्हणून ते बोलणार आहेत, हे पण लक्षात घ्या. न्यायालयात आपण न्याय मागू. संचारबंदी उठवली नाही तर त्याविरोधातही आम्ही न्यायालयात घेऊन जाऊ. आमच्या काही लोकांना उचललं आहे. हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे का? सिल्लोड, अंबड, संभाजी नगर सगळ्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं. माझी देवेंद्र फडणवीसांना शेवटची विनंती आहे त्यांनी मराठा आंदोलनाचा रोष घेऊ नका. आपण आता चर्चा करुन पुढचा निर्णय घेऊ असंही जरांगे म्हणाले.