राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर असा त्यांचा तीन दिवसांचा विदर्भ दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे नागपूर, वर्धा व अमरावती जिल्ह्यांमध्ये फिरणार असून तिथे काही स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या या दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. सेवाग्रामध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीसांनी सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याबाबतच्या प्रश्नावर टोला लगावला. तसेच, जनता राज ठाकरेंकडे मुख्यमंत्री म्हणून पाहाते, या मनसे नेत्यांच्या दाव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज ठाकरेंबाबत मनसे नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. “ज्या ज्या पक्षातल्या ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे नेते भावी मुख्यमंत्री वाटतात, त्या सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
ओबीसी मतदार लक्ष्य?
दरम्यान, ओबीसी योजनांबाबत जनजागृती यात्रा काढण्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. “जनजागृतीची योजना आहे. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघतेय. वेगवेगळ्या भागात ही यात्रा जाईल. तिथे ओबीसी योजनांच्या संदर्भात जागृती केली जाईल. ओबीसींसाठी इतक्या योजना महाराष्ट्र व केंद्र सरकारनं तयार केल्या आहेत. ओबीसी समाजात परिवर्तन करणारी विश्वकर्मा ही मोठी योजना आहे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं यासाठी हा प्रयत्न आहे”, असं ते म्हणाले.
सुप्रिया सुळे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, उद्दिष्ट काय? जाणून घ्या…
सुप्रिया सुळेंना टोला
सुप्रिया सुळेंच्या नागपूर दौऱ्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचं फडणवीस म्हणाले. “मला एका गोष्टीचा आनंद आहे की इतक्या वर्षांनंतर का होईना, सुप्रिया सुळेंना विदर्भ आठवला. विदर्भ महाराष्ट्राच्या नकाशावर आहे हे सुप्रिया सुळेंना लक्षात येतंय. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत”, असं ते म्हणाले.