Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची एक ते दोन वेळा विकासकामांच्या मुद्यांवरून भेट घेतली होती. या भेटींमुळे राज्यात पुन्हा नवी समीकरण पाहायला मिळणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, यावरही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
नागपूरमध्ये आज जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यावर फडणवीसांनीही आपल्या शैलित प्रश्नांची ‘राजकीय’ उत्तरं दिली. यावेळी राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळ्यापणे उत्तरे दिली.
राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी म्हटलं की, “राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत.”
अजित पवार की एकनाथ शिंदे?
मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार की एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “माझ्यापुरतं विचारलं तर माझे दोघांशी देखील अतिशय चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. तसेच अजित पवार यांच्यामध्ये एक राजकीय परिपक्तवता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर मोठ्या प्रमाणात जुळतात”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
ठाम, कठोर राजकारणी कोण? मोदी की शाह?
या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुशासित राजकारणी आहेत. त्यांनी जो मार्ग पकडला त्या मार्गावरून मग कितीही अडचणी आल्या तरी त्यामधून बाजूला व्हायचं नाही हे अनु अनुशासन फार कठीण आहे. आता मग मला विचारलं तर त्यांच्या एवढं १० टक्केही माझ्याकडे अनुशासन नाही. त्यामुळे त्यांना कठोर म्हणता येणार नाही. तसेच अमित शाह असे आहेत की त्यांना जर आपण असं म्हटलं की एखादा राजकीय दृष्टीने निर्णय करायचा तर ते घेऊ शकतात”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.