Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं विधान अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अबू आझमी यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, असं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरी संदर्भात भूमिका स्पष्ट केली. तसेच औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. त्यांच्या या मागणीच्या संदर्भातील प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं (ASI) संरक्षण मिळालेलं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले काय म्हणाले होते?

“औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

अबू आझमींनी काय वक्तव्य केलं होतं?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही”, असं विधान अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.