राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड मारली आहे. दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा धाड मारली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर मुश्रीफ कार्यकर्ते ईडी, भाजपा आणि किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगरमध्ये आले होते. तेव्हा हसन मुश्रीफ यांच्या घरी पडलेल्या धाडीबाबत प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, “मला त्याची कोणतीही कल्पना नाही. माध्यमांवरच त्याबद्दल पाहिलं,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : “बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा एकनाथ शिंदे…”, ठाकरे गटाच्या खासदाराचा हल्लाबोल

तसेच, संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे. यावरती देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “संभाजीनगरमध्ये शांतता राहावी. आंदोलकांनी आंदोलन परत घ्यायला हवं. नामांतरासंदर्भात एक प्रक्रिया झाली. त्यातूनच हा निर्णय झाला आहे. भारतात छत्रपती संभाजी महाराजांचा उदो उदो होणार आहे. औरंगाजेबचा उदो उदो होऊ शकत नाही. त्यामुळे तिथे शांतता नांदण्यासाठी जी काही कारवाई करावी लागेल, ती करू,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा : “…तर आम्ही न्यायालयात दाद मागू”; आशिष देशमुखांचा थेट मल्लिकार्जुन खरगेंना इशारा!

“एकदाच आम्हाला गोळ्या घाला”

ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घाला,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis on ed raid hasan mushrif home kagal kolhapur ssa