भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. यानंतर अजित पवार गटाकडून पडळकर यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
हेही वाचा : “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
“अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत”
गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.”
हेही वाचा : “…तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ”, अजित पवार गटाचा फडणवीसांना थेट इशारा
“धनगर समाजाबद्दल पुळका आणण्याची गरज नाही”
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीकास्र सोडलं होतं. “धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत,” अशा शब्दांत पडळकरांनी सुळेंना सुनावलं होतं.