महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. महायुतीकडून मनसेला एक किंवा दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा सध्या चर्चेत आहे. मनसे जर महायुतीत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. या भेटीवर आता बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजतील”, अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा : शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचा गंभीर आरोप, “भाजपाला सुप्रियाला बारामतीत पाडायचं आहे, कारण..”
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
“राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होईल. याआधी मी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आता राज ठाकरे यांनी सांगितल्यास गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. राज ठाकरे सांगतील त्यानुसार निर्णय घेऊ”, असे बाळा नांदगावकर म्हणाले होते.
राज ठाकरे यांची भाजपा आणि शिवसेनेशी जवळीक
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनीही ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा चालू होती.