काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आज ( ७ सप्टेंबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
अकोला येथे जिल्हा आढावा बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करुन टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचं आहे. उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत. एकनाथ शिंदेंशी तुमचं पटत नसेल, पण काही पथ्य पाळली पाहिजेत,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं होते. त्यांनी म्हटलं की, “नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?,” असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला.