विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. आता विधानपरिषदेच्या या ११ जागांच्या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी ५ वाजल्यानंतर मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेमधून निवृत्त झालेल्या आमदारांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज विधानपरिषदेत पार पडला. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“अनिल परब हे पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे निरोपाऐवजी त्याचं स्वागत करतो. आता ते पदवीधर मतदारसंघामधून आमदार झाले आहेत. अर्थात तुम्ही पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेत आला असलात तरी फक्त पदवीधरांचे प्रश्न मांडणार नाहीत, तर राज्यातील सर्वच पश्न तुम्ही सभागृहात मांडताल, याची कल्पना आम्हाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांचं कौतुक केलं.

हेही वाचा : “बाबाजानी दुर्राणी यांची बिर्यानी खाल्याशिवाय…”, अनिल परबांनी सभागृहात सांगितला किस्सा

फडणवीस पुढे म्हणाले, “मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये अनिल परब यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वेगवेगळे आंदोलनं, गणेशोत्सव असेल, दहीहंडीसह सामाजिक कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमात त्यांची हातोटी राहिलेली आहे. विविध संस्थांमध्ये त्यांनी मोलाचं काम केलं आहे. विशेषत: प्रश्नांची जान त्यांना आहे. ते स्वत: वकील असल्यामुळे त्यांना प्रश्नांतील बारकावे माहिती असतात. अनेकदा आमच्यासमोर ते वकिली डाव टाकतात. मग आम्हालाही आमच्यातील वकील जागा करावा लागतो आणि वकिलाप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. विचार वेगळे असतील पण एक संसदपटू म्हणून ते चांगलं काम ते करतात”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांचं कौतुक केलं.

दरम्यान, विधान परिषदेवर असणारे १५ सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये कपिल पाटील, विलास पोतनीस, मनीषा कायंदे, भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, रमेश पाटील, नीलय नाईक, महादेव जानकर, रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा हे निवृत्त होत आहेत. यामध्ये निरंजन डावखरे, अनिल परब, किशोर दराडे हे पुन्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून विधानपरिषदेत आले आहेत. तर प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. १२ जुलै रोजी रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis praised shiv sena thackeray mla anil parab monsoon session maharashtra gkt
First published on: 04-07-2024 at 19:56 IST