काही दिवसांपूर्वी धर्माबाहेर विवाह करणाऱ्या मुलींसंदर्भात महाराष्ट्र सरकारनं एक समिती स्थापन केली होती. ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह – परिवार समन्वय समिती’ असं या समितीचं नाव होतं. राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली होती.
या समितीच्या नावात ‘आंतरजातीय’ असा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर विरोधी पक्षातील नेते आणि राज्यातील प्रमुख महिला संघटनांनी या समितीला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून नवा आदेश जारी करत ‘आंतरजातीय’ हा शब्द वगळण्यात आला. पण, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’मध्ये बोलत होते.
“आंतरजातीय विवाहाला सरकार प्रोत्साहन…”
“राज्य सरकारने स्थापन केलेली ही समिती ‘आंतरधर्मीय’ विवाहासंदर्भात आहे. ‘आंतरजातीय’ विवाहाबद्दल नाही. ‘आंतरजातीय’ विवाहाला सरकार प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. आंतरधर्मीय विवाहासंबंधात जी समिती स्थापन केली आहे, ती अशा विवाहांना विरोध करण्यासाठी नाही. ‘आंतरधर्मीय’ विवाहांमधून मोठ्या प्रमाणात काही गोष्टी बाहेर येत आहेत. ‘आंतरधर्मीय’ लग्न होते, आणि पुढे सहा-आठ महिन्यांत मुलगी परत येते. तिची फसवणूक होते. एखाद दुसरी घटना असेल तर ठीक आहे, ती एक धर्मात, जातीतही होते. पण, काही जिल्ह्यांत अशा घटनांची जी आकडेवारी पुढे येत आहे, ती धोक्याचा इशारा देणारी आहे. ही समिती त्यासाठी तयारी केली आहे,” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
“आंतरधर्मीय विवाह बंद करण्याचा विषय नाही परंतु…”
“चार-पाच वर्षापूर्वी मला विचारले असते तर मीही म्हटलं असते की ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही अस्तित्वातच नाही. मी त्या विचाराचा होतो, मात्र आता ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्यामुळे ‘आंतरधर्मीय’ विवाह बंद करण्याचा विषय नाही. परंतु, त्यात काही ना काही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे,” अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली आहे.
“सहमतीने विवाह झाले तर उत्तम पण…”
“‘आंतरधर्मीय’ विवाहांमुळे सामाजिक सौहार्द बिघडत आहे. रोज दंगे व्हायला लागले आहेत. गावागावांमध्ये समाज एकमेकांच्या समोर येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत सरकार शांत बसू शकत नाही. असे नाही की कोणत्या तरी धर्माला थांबवण्यासाठी किंवा दोन धर्मात लग्नच होऊ नये, असा विषय नाही. सहमतीने विवाह झाले तर उत्तम आहे. सगळे उत्तम चालले तर काही अडचण नाही. पण, त्यामागे काही कट दिसत असेल तर ते समोर आणले पाहिजे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.