सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज दिसत आहेत. २७ जानेवारी रोजी मराठा समाजासाठी काढलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी कडाडून टीका केली. तसेच सातत्याने ओबीसी समाजासाठी आवाज उचलणाऱ्या भुजबळांपासून राष्ट्रवादीनेही अंतर राखणे पसंत केले होते. अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही भुजबळ यांची भूमिका पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट अंजली दमानिया यांनी टाकली होती. त्यावर आता भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“भुजबळांबाबत भाजपाचं ठरलंय”, अंजली दमानियांचा मोठा दावा; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेत असतो, अंजली दमानिया आमचे निर्णय घेत नाहीत. अंजली दमानिया अलीकडच्या काळात सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात आहेत, त्यामुळे त्या अशा पोस्ट टाकत असतील. पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. “अंजली दमानिया यांना एवढंच सांगेन की, छगन भुजबळ भाजपाच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः भाजपामध्ये येण्याची कधी इच्छा व्यक्त केलेली नाही आणि ते कधी भाजपामध्ये येणारही नाहीत. चुकीच्या बातमी पसरवणे योग्य नाही”, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

“भाजपा ४०० पार कशी जाते तेच बघतो”, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान; म्हणाले, “तुमच्याकडे आलेल्या बाजारबुणग्यांचं…”

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

“भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?” असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एक्स (ट्विटर) वरील पोस्टमधून उपस्थित केला आहे.

दरम्यान, हे ट्वीट व्हायरल होऊ लागल्यानंतर अंजली दमानियांनी त्यावर त्यांची नेमकी भूमिका टीव्ही ९ शी बोलताना स्पष्ट केली आहे. “काही दिवसांपूर्वी मला कुणीतरी सांगितलं होतं की भुजबळांना भाजपा ओबीसी चेहरा बनवणार आहेत. फक्त राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना तसं प्रमोट केलं जाणार आहे. मागे मंडल आयोगाच्या लढ्याच्या वेळी भुजबळांनी दिलेलं योगदान बरंच मोठं होतं. त्यामुळे भुजबळांना तसं करायचं भाजपाचं ठरलंय. त्यामुळे मला जेव्हा हे पुन्हा कळलं, तेव्हा फार विचित्र वाटलं”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

Story img Loader