राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेमकं चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीच नाही, असा दावा शरद पवारांसह काही नेत्यांकडून केला जात आहेत. तर अजित पवार गटाकडून प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावला जात आहे. यामुळे राजकीय नेत्यांसह जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण सत्तेत आणि विरोधीपक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने ही सर्व शरद पवारांचीच खेळी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होत असतात. त्यामुळे संपूर्ण जग शरद पवारच चालवतात, अशाप्रकारे बोललं जातं, अशी उपरोधिक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते ‘पुढारी’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? उदय सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने आपली जागा भक्कम आहे, असं भाजपाला वाटत असलं तरी ही सर्व खेळी शरद पवारांचीच आहे, या चर्चेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होतात. मग काही भक्त असेही आहेत की, जगात जे काही चालतं ते शरद पवारच चालवतात, असं त्यांना वाटतं. मला शरद पवारांबद्दल आदर आहे. पण काही भक्तांना असं वाटतं. त्यामुळे हे जग आमचे पवारसाहेबच चालवतात, अशाप्रकारे बोललं जातं.”

हेही वाचा- राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवारांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मला असं वाटतं की, आता आम्ही तिघे एकत्रित आहोत. अतिशय भक्कपणे एकत्र आहोत. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू. पुन्हा आम्ही निवडून येऊ… चांगल्या प्रकारे आम्ही निवडून येऊ. आमच्या जागा आणखी वाढतील. जागा कमी होणार नाहीत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तर अजित पवार त्यांचा सल्ला घेतात. कधी आम्हालाही शरद पवार सल्ला देत असतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis reaction on ncp split and sharad pawar political stand ncp in govt and also in opposition rmm
Show comments