मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील २० दिवसांत मुंबईचा दोन वेळा दौरा केला आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेवर भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाहीत, तेच लोक दुसऱ्यांवर टीका करतात. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील, तर येथील लोकांनी आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते इकडे येताना, नेहमी काही ना काही घेऊन येतात, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- …अन् भाजपा नेत्यांना गायीने लाथाडलं, ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल
पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकच मिशन आहे, ते म्हणजे ‘मिशन इंडिया’… मिशन इंडियासाठी ते देशभरात फिरत असतात. ते मुंबईत दुसऱ्यांदा आले असतील, तर त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते येताना काहीतरी घेऊन येतात. आता पहिल्यांदाच एका राज्यात धावणाऱ्या दोन ‘वंदे भारत’ गाड्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. हा मान पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाला.”
हेही वाचा- “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा”, कट्टर विरोधक एकनाथ खडसेंचं विधान
“त्यातील एक गाडी शिर्डीला जाणारी आहे. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी अशा सगळ्या तीर्थक्षेत्राला आपण जोडणार आहोत. दुसरी गाडी सोलापूरला जाणारी आहे. ज्यामुळे पांडूरंग, तुळजा भवानी, सिद्धेश्वर आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेणं सुकर होणार आहे. मला वाटतं जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाहीत, तेच लोक यावर टीका करतात,” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.