लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या अवघ्या नऊ जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या. या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पक्षाकडे विनंती करणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं आहे. तसेच, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं ते म्हणाले आहेत. “कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान

मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे

“भाजपाला महाराष्ट्रात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या त्या सगळ्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीत हार-जीत होत असते. त्याने खचून जाता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता काही लोक मोदी हटाव, मोदी हटाव असे म्हणत असले तरी जनतेने एनडीएच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

सागर बंगल्यावर हालचालींना वेग

देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत.प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि सुकाणू समितीतील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर न पडण्याची विनंती केली आहे. भाजपा नेते फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले असून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती कळते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis ready resign after loksabha election results cm eknath shinde first reaction scj
Show comments