Maharashtra Divas 2023 : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्साह साजरा केला जातोय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करत महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत संकल्प मांडला आहे.
“महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी राजकीय नेत्यांनी संबोधलं होतं की आज देशामध्ये १४ वं रत्न जन्माला आलं. त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रचंड प्रगती ही संपूर्ण देशामध्ये सर्वांचे डोळे दीपून जातील अशाप्रकारचे राहिली आहे. देशाच्या जीडीपीत १५ टक्के योगदान महाराष्ट्राचं आहे. देशाच्या एकूण इंडस्ट्रीस आऊटपूटमध्ये २० टक्के आऊटपूट महाराष्ट्र देतंय. देशाच्या एकूण निर्यातीच्या १५ टक्के निर्यात महाराष्ट्रातून होतेय. देशामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय. वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने अतिशय चांगली प्रगती केली आहे. माता मृत्यू दर, अन्य सामाजिक मानकं यामध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे. अत्यंत पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने बघितलं गेलं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> Video : “जे मी जगात पाहिलंय…”, महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “अख्ख्या जगाला…”
“नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली नवं सरकार आलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपण प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम आपण केलं आहे. या अर्थसंकल्पांत अनेक योजना घोषित केल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मोदींनी किसान सन्मान योजान सुरू केली आणि सहा हजार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतला. त्याला जोड म्हणून नव किसान सन्मान योजना आपण सुरू केली आणि सहा हजार दिले. म्हणजेच शेतकऱ्याच्या खात्यात आता १२ हजार येत आहेत”, असं सांगत आतापर्यंत सुरू केलेल्या सर्व योजनांचा थोडक्यात आढावा फडणवीसांनी घेतला.
“महाराष्ट्र प्रगतीशील राहिला आहे, त्याला आणखी प्रगतीशील करायचं. ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीपर्यंत महाराष्ट्राला न्यायचं आहे. शेवटच्या माणसांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन प्रगतीशील महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकार कार्यरत राहील”, असा संकल्पही त्यांनी यावेळी मांडला.