गुरुवारपासून महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी प्रथेप्रमाणे बहिष्कार घातला. तसंच गुरुवारपासून सुरु होणारं अधिवेशन हे सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यानंतर आता महायुतीने पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षाने जे पत्र दिलं आहे आणि जे प्रश्न सरकारला विचारले आहेत त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. खोटं बोल पण रेटून बोल हेच विरोधकांचं धोरण आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाने पत्र दिलं आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे त्यांचं धोरण. खोटं बोलून एखाद्या निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटंच बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला आहे असं मला वाटतं. त्यांनी दिलेलं पत्र एका वाक्यात सांगायचं तर आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे. त्यांनी म्हटलं आहे की विदर्भातले सिंचनातले प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश. अडीच वर्षे ज्यांचं सरकार होतं त्यांनी विदर्भातला एकाही प्रकल्पाला गती दिली नाही. ते आम्हाला सांगत आहेत की विदर्भातले प्रकल्प मार्गी लागले नाहीत. बळीराजासारखी योजना आणली आहे. तसंच ८७ प्रकल्प आपण पूर्ण करत आणले आहेत. २०१९ मध्ये वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाचा जीआर काढला. आधीच्या सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या गतीनेही हलली नाही. नवं सरकार आल्यानंतर ती वेगाने पुढे गेली. असे लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्या पत्रावर उद्धव ठाकरे,नाना पटोलेंची सही आहे. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.
हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, “ड्रग्ज प्रकरणाचं विरोधकांनी राजकारण करु नये, अन्यथा..”
पेपरफुटीची सर्वाधिक प्रकरणं उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात
वैधानिक विकास मंडळ त्यांनी लॅप्स केलं. नवं सरकार आल्यानंतर ते आम्ही ते केंद्राशी बोलून नियमित केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. आता ते आम्हाला विचारत आहेत की वॉटर ग्रीडचं काय झालं? आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल केला आहे. त्यांना विनंती केली आहे की हर घर जलमध्ये याचा समावेश करा. पेपरफुटीच्या संदर्भात आता हे विरोधक बोलत आहेत. पण सर्वात जास्त पेपरफूट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. जवळजवळ सगळ्याच परीक्षा टीईटी किंवा इतर परीक्षा. हे आम्हाला प्रश्न विचारत आहेत. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेतल्या त्याचे रिपोर्ट कार्ड आम्ही मांडणार आहोत. गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली हे सांगत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे विसरत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात महाराष्ट्र क्रमांक एकवर आला आहे. वित्तीय केंद्र गुजरातला गेलं सांगत आहेत. कधी गेलं? २०१२ मध्ये गेलं. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? काँग्रेसचे आणि पंतप्रधानही काँग्रेसचे. आता ते आज यावरुन आम्हाला प्रश्न विचारत आहेत. खोटं नरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी विरोधकांनी उघडली आहे. याचा पर्दाफाश आम्ही निश्चितपणे करु.
वसुली सरकार असा मविआचा लौकिक झाला होता
गँगस्टर उभे राहिले आहेत, ड्रग्जच्या संदर्भात हो हल्ला केला जातो आहे. मविआ विसरलं आहे की १०० कोटींच्या वसुलींच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर करुन त्यांना अटक केली होती. त्यावेळी सरकार त्यांचं होतं. आम्ही काही केलं नाही. त्यांच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे सांगितलं होतं. आज आम्ही ड्रग्जच्या विरोधातली लढाई सुरु केली. मोठ्या प्रमाणावर कारवाई होते आहे.
बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा हे सगळं कुणी केलं?
पुण्यातली पोर्श अपघाताची घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने याबाबतही कठोर भूमिका घेतली आहे. झीरो टॉलरन्स पॉलिसीवरच आम्ही काम करतो आहोत. जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत ते त्यांनी स्वतःला विचारावेत. तसंच अधिवेशनात त्यांना उत्तर देऊच. विरोधकांनी हे लक्षात ठेवावं की एक बोट आमच्याकडे करत असले तरीही चार बोटं त्यांच्या दिशेनेच आहेत. विरोधकांची अकर्मण्यता, भ्रष्टाचार किती आहे ते बघा. ४० टक्क्यांचं सरकार आम्हाला म्हणत आहेत. बॉडी बॅगचा घोटाळा, कोव्हिडमधले घोटाळे, खिचडी घोटाळा हे सगळं कुणी केलं? प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रकार त्यावेळी यांनी सत्तेत असताना केला. विरोधी पक्ष जे काही विसरला आहे ते आम्ही विसरलो नाही. आम्ही सगळी उत्तरं देऊ. हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं हे विरोधी पक्ष करतो आहे. त्यांनी सभागृहात बोलावं याची उत्तरं आम्ही देऊ. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.