Sanjay Raut महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं. तसंच माझ्याविरोधात बोलल्याने कुणाला फायदा होतो हे सगळ्यांना ठाऊक आहे असंही फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत मी पुराव्यांशिवाय बोलत नाही असंही उत्तर त्यांनी दिलं. त्याबाबत Sanjay Raut यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स सुरु केलं अशी टीका त्यांनी केली आहे.
भाजपाचा क्लिप्सचा कारखाना आहे-संजय राऊत (What Sanjay Raut Said? )
“भाजपाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली. भाजपाचा क्लिप्सचा कारखाना आहे. क्लिप्स बनवा, लोकांचे फोन टॅप करा. विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. विरोधकांचे फोन टॅप करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यांना जर देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर क्लिप्सचं काय घेऊन बसलात? आमच्या सगळ्यांचे फोन ज्यांनी चोरुन ऐकले किंवा ऐकायला दिले. त्यांचं निलंबन होणार होतं, पण त्याच महिला अधिकारी सरकार बदलल्यावर पोलीस महासंचलाक झाल्या. असं होणार असेल तर फडणवीसांकडून काय अपेक्षा ठेवणार?” असा सवाल Sanjay Raut यांनी केला.
अनिल देशमुख यांचं म्हणणं खरं आहे
“अनिल देशमुख यांनी जे सांगितलं ते १०० टक्के सत्य आहे. ईडीतून नाव काढून घ्यायचं असेल तर आम्ही सांगतो ते ऐका हे भाजपाचं धोरण आहे. मलाही असंच सांगण्यात आलं होतं. अशोक चव्हाण, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंडळी तिकडे का गेली? मिंधेंबरोबरचे आमदार, खासदार का गेले? नवाब मलिक का गेले? कारण या सगळ्यांनी ईडीपासून बचाव करण्यासाठी आणि भाजपाच्या दबावाखाली तिकडे गेले आहेत. मी तुरुंगात असताना मलाही त्यांनी हे सगळं सांगितलं आहे. अनिल देशमुख सत्य बोलत आहेत. अनेकदा सत्याला पुरावा नसतो, गोळा करता येत नाही, त्यामुळे सत्य पराभूत होतं. ” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.
फडणवीसांमुळे राज्यात डर्टी पॉलिटिक्स
“या महाराष्ट्रात राजकारणाचं अधःपतन कुणी केलं असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. लोकांचे फोन टॅप करा, क्लिप्स बनवा. अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, क्लिप्स तयार केल्या. मला तर वाटतं की मोदी ज्याप्रमाणे नॉन बायलॉजिकल पंतप्रधान आहेत तसंच महाराष्ट्राला नॉन बायलॉजिकल गृहमंत्री मिळाला आहे. या भूमीवरचा माणूस नाही वरुनच पडला आहे हा माणूस. या राज्याच्या राजकाणाची प्रतिष्ठा ठेवणार की नाही? या महाराष्ट्रात अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स हे गेल्या पाच ते दहा वर्षांत वाढलं आहे. देशात मोदी आणि शाह आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून हे वाढलं आहे. डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं राजकारण हे सुरु झालं आहे. ” अशी बोचरी टीकाही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली.
महाराष्ट्रातला पूर सरकारला दिसत नाही का?
अर्थसंकल्पात बिहारला पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी १८ हजार कोटी देण्यात आले. माझा या सरकारला आणि अर्थमंत्र्यांना प्रश्न आहे की त्यांना महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत. १८०० कोटी तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मागत आहेत का? या सरकारने सत्तेच्या खुर्च्या उबवू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बिहारला निधी मिळाला तो योग्यच आहे मात्र महाराष्ट्राचं काय? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.