कीर्तनकार आणि ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांचं २६ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदयावर शोककळा पसरली. त्यांचं पार्थिव नवी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आज बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत जाऊन बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या स्मारकाची घोषणा केली. तसंच एक महत्त्वाचं वक्तव्यही केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“कीर्तनाकर, निरुपणकार, ज्येष्ठ विचारक असलेल्या बाबा महाराज सातारकर यांचं दुःखद निधन झालं. आज मी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. सातारकर कुटुंबाची फार मोठी परंपरा या संपूर्ण वारकरी संप्रदायात आहे. बाबा महाराज सातारकरांपासून चौथी पिढी भागवत धर्मासाठी कार्य करते आहे. विशेषतः अतिशय पुरोगामी विचारांनी बाबा महाराज सातारकरांनी सर्वसामान्य माणसाला भागवत धर्म समजेल अशा पद्धतीने प्रवचन सुरु केलं. लाखो लाखो लोकांच्या आयुष्यात बाबा महाराज सातारकरांनी परिवर्तन आणलं. व्यसनमुक्ती झाली. वारकरी संप्रदाय, भागवत धर्म हा सामान्य माणसांपर्यंत रुजवण्याचं काम त्यांनी केलं.”
बाबा महाराज सातारकर यांच्या विचारांचं स्मारक झालं पाहिजे
“बाबा महाराज सातारकर यांचं बोलणं मृदू आणि सामान्य माणसाला कळेल असं होतं. आता बाबा महाराज सातारकर आपल्यात नाहीत ही दुःखद बाब आहे. बाबा महाराज सातारकर यांचं स्मारक तर होईलच पण त्यांच्या विचारांचं स्मारक तयार झालं पाहिजे. याबाबत मी त्यांच्या कुटुंबाशी बोलणार आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या विचारांचं जिवंत स्मारक आपल्याला करता आलं पाहिजे. त्यांचे विचार पुढच्या पिढीला कसे मिळतील? त्यातून प्रेरणा घेऊ हे विचार कसे पुढे न्यायचे? हे त्यांच्या जिवंत स्मारकात कररता येईल.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं शुक्रवारी पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २७ म्हणजे आज ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.