Eknath Shinde : राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धूसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचं कारण म्हणजे पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्‍यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा समावेश आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर भरत गोगावले यांनी नाराजी जाहीर बोलून दाखवली होती. मात्र, त्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पालकमंत्री पदाच्या या घडामोडींवरून महायुतीत धूसफूस सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, आता या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर आम्ही हा प्रश्नही सोडवणार आहोत’, असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मंत्री उदय सामंत यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार फुटणार आहेत. अनेकजण तुम्हाला भेटून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही राजकीय ऑपरेशन होणार आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “तुम्ही त्याचा अर्थ राजकीय का काढता? जेव्हा आम्हाला असा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू”, असं मिश्किल उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?

“मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडल्यानंतर तेव्हाच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी आणि आम्ही सर्वांनी त्या योजनेला मान्यता दिली. आम्ही टीमवर्क म्हणून काम केलं. आताही आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. लोकांच्या जीवनात आपण काय बदल घडवू शकतो. मला काय मिळणार यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही अडीच वर्ष काम केलं. आताही आम्ही टीम म्हणून काम करत आहोत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

पालकमंत्री पदाबाबत शिंदे काय म्हणाले?

पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर महायुतीत धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील. तुमचे जे-जे प्रश्न आले आहेत, मग त्यामध्ये सरकार स्थापन होण्यापासून ते आतापर्यंतचे सर्व प्रश्न आम्ही सोडवले. आता पालकमंत्रिपदाचा प्रश्नही सुटेल”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde on guardian minister maharashtra list mahayuti politics in nashik and raigad ncp vs shivsena gkt