Eknath Shinde on Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. तसेत कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. यामुळे देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून आज (दि. १३ जानेवारी) संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं. या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेले आहेत. येथील माध्यमांनी त्यांना विविध प्रश्नांवर बोलतं केलं. संतोष देशमुख प्रकरणावर बोलत असताना त्यांनी म्हटले की, आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी त्यांना सोडले जाणार नाही.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली असून सीआयडीही चौकशी करत आहे. आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपीचे कुणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. आरोपींनी ज्या निर्घृण पद्धतीने हत्या केली, तशाच प्रकारे त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडेल”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
संतोष देशमुख प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेत, हे प्रकरण लावून धरले. त्यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले की, एका लोकप्रतिनिधीची अशा निर्घृण पद्धतीने हत्या होत असेल तर कुणीही शांत बसणार नाही. आम्हीही त्यांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करून.
धनंजय देशमुख यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच पोलीस तपासावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासाठी आज त्यांनी मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज ते टॉवरवर चढले. तर, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील गावात तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रशासन व अनेक नेत्यांनी त्यांची विनंती केली. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनवण्या केल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं व ते टॉवरवरून खाली उतरले.