DCM EKnath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजनेस जत्रा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित उद्योगपती आणि व्यावसायिकांशी संवाद साधला. तसंच, दावोसला केलेल्या करारांविषयीही माहिती दिली. यावेळी त्यांनी सरकार कसं आणलं याविषयीही मिश्किल टिप्पणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “गेले अडीच वर्षे काम करत असताना सर्व सेक्टरसाठी निर्णय घेतले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो याचा सगळ्यांनाच आनंद झाला. उद्योगपती, छोटे उद्योगपती, महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. लाडका भाऊ योजनाही आणली. आतापर्यंत कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांना स्टायपेंड दिला जात नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो. आपल्या महाराष्ट्र पॅविलिनमध्ये एवढी गर्दी व्हायची की वेगवेगळ्या देशाचे प्रमुख भेटायला आले. आपल्याबरोबर वेगवगेळे करार केले. मला वाटलं नव्हतं, की एवढा रिन्स्पॉन्स मिळेल. त्यांना काय माहिती कधी सरकार जातंय, नवीन येतंय. पण मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं होतं. ते गरजेचं होतं. कारण, आधीचं सरकार लॉकडाऊन सरकार होतं. उद्योग, दुकान मकान बंद. सगळं बंद असलं तर कसं चालेल. हे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आवश्यक होतं”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”

“महाराष्ट्राला उद्योगांची मोठी आणि समृद्ध परंपरा असून मराठी उद्योजकही आता पुढे येत अनेक क्षेत्रात व्यवसाय करत आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचीही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

उद्योगमंत्री उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे

“राज्यात महायुतीचे सरकार असताना उद्योजकांना पूरक असे निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज राज्य थेट परदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे. आधीच्या राजवटीत उद्योजकांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी यापुढे असे काहीही होणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“उद्योग मंत्री हे उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून तुमच्या कोणत्याही समस्या असतील त्या सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात १.५ ट्रीलीयन डॉलरची उलाढाल करण्याची क्षमता असल्याचे नीती आयोगाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने आपल्या सर्वांना मिळून काम करायचे आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक उद्योजकाचा उद्योग पुढील वर्षी दुप्पट व्हायला हवा”, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde talked in thane buisness jatra about rebel sgk