कराड : पाटण तालुक्यातील सणबूर येथे वृध्द शेतकरी, त्याची पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी अशा एकाच कुटुंबातील चार जणांचे राहत्या घरी मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली असून, हा आत्महत्या की घातपात याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (४५, सर्व रा. सणबूर, ता. पाटण) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपासून आनंद जाधव हे आजारी असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांना उपचारासाठी कराडमधील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले. तसेच रात्री सणबूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवण्याची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान, वीज नसल्यामुळे जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली होती. आजारी आनंद जाधव यांच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघेजण याठिकाणी होते.
दरम्यान, सणबूर येथील आनंद जाधव यांचे घर एका बाजूला आहे. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती. तसेच पुन्हा शुक्रवारी सकाळी त्यांने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणी भ्रमणध्वनी स्वीकारत नसल्याने त्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यास विनंती केली. त्यानंतर काही लोक विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जावून त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, कोणीही आवाज न दिल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केल असता चार जण अंथरुणावर पडलेल्या स्थितीत आढळून आले. यावर त्यांनी याची माहिती नातेवाईक व पोलिसांनाही कळवली. त्यानंतर तात्काळ ढेबेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील हे चारही जण मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट होताच पाटण तालुका हादरून गेला. या चौघांच्या गुढ मृत्यूचे स्पष्टीकरण वैद्यकीय उत्तरीय तपासणीतून पुढे येणार असल्याने त्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.