पकडण्यासाठी तब्बल २० लाखांचे बक्षीस; एकाच वर्षांत ५२ पोलिसांची हत्या; गडचिरोलीत ४० गुन्हे
गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षल चळवळीचा मुख्य सूत्रधार व ५२ पोलिसांसह लॉयड मेटल्सच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा कट रचणारा जहाल नक्षलवादी आयतू उर्फ अशोक गजराला याने तेलंगणा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. पकडण्यासाठी तब्बल २० लाखांचे बक्षीस असलेल्या आयतूवर गडचिरोली जिल्ह्य़ातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल ४० गुन्हे दाखल आहेत.
गेल्या महिनाभरापासून आयतू तेलंगणा पोलिस दलाच्या ताब्यात होता. वारंगल पोलिस दलाने मंगळवारी दुपारी आयतूला प्रसार माध्यमांसमोर हजर करून त्याच्या आत्मसमर्पणाची माहिती दिली. विशेष म्हणजे आयतू हा गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षल चळवळीचा मुख्य सूत्रधार होता. गडचिरोलीत नक्षल चळवळ रुजविताना त्याने २००९ या एकाच वर्षांत तब्बल ५२ पोलिसांची हत्या केली. आयतूने २००९ या वर्षी मुरमुली येथे घडवून आणलेल्या स्फोटात ७, तर त्यापाठोपाठ मरकेगांव येथील सुरूंग स्फोटात १५, पुस्टोला येथील भुसुरूंग स्फोटात १३, यानंतर मलमपद्दूर येथे केलेल्या सुरूंग स्फोटात १७, तर हत्तीगोटा येथील भुसुरूंग स्फोटात पोलिसांची जिप्सी उडविल्याने १६ जवान ठार झाल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
आयतूने गडचिरोलीत अनेकांची हत्या केली. लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष जसपालसिंह ढिल्लन, हेमलता मिनरल्सचे मल्लिकार्जून रेड्डी व सुरजागडचा पोलिस पाटील राजू सदाफड या तिघांची १३ जुलै २०१३ रोजी बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण करून उद्योगविश्वात खळबळ उडवून दिली होती.
लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष सुरजागड येथील मिनरल्स संदर्भात नक्षलवाद्यांशी बोलणी करण्यासाठी एटापल्ली येथे आले होते. मात्र, बोलणी फिसकटली आणि आयतूने नेमका डाव साधून या तिघांची हत्या घडवून आणली होती. गडचिरोली जिल्ह्य़ात आयतूविरुध्द विविध पोलिस ठाण्यात किमान ४० ते ५० गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी आयतूस पकडण्यासाठी २० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. महिनाभरापूर्वी तेलंगणा पोलिस दलाच्या हाती तो लागला. तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी माध्यमांसमोर आयतूने आत्मसमर्पण केल्याचे सांगितले.
जहाल नागेश चकमकीत ठार
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी नागेश याला ठार मारण्यात आंध्र प्रदेश पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्य़ालगत आंध्र सीमेवर नागेश असल्याची माहिती आंध्र पोलिसांना मिळाली. या आधारावर चिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मलमपेट्टा येथे पोलिसांनी नागेशला घेरले. यावेळी झालेल्या चकमकीत नागेश ठार झाला. नागेशवरला पकडण्यासाठी ८ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याची पत्नी करुणा ही नक्षलवादी चळवळीत सक्रीय आहे.