कर्णबधिर मुलांचे वेगवेगळे निरागस प्रश्न आणि त्यांच्याशी तितक्याच दिलखुलासपणे संवाद साधणारा “मास्टर ब्लास्टर” सचिन तेंडुलकर. हे दृश्य होते गुरुवारी येथे अमित इंटरप्राइझेस हौसिंग लिमिटेडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील. सचिनने माई लेले श्रवण विकास विद्यालयाच्या कर्णबधिर मुलांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी सचिनचे गुरू आचरेकरसर, सचिनचा मुलगा, मॅच झाल्यावर मित्रांसोबत काय करतात, हरले तर कसे वाटते, असे विविध प्रश्न विचारले. त्याला सचिनने समर्पक उत्तरे दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी सचिनने सदैव उत्तम खेळत राहावे व बक्षिसे मिळवावीत, अशा शुभेच्छा दिल्या.  मुलांचा प्रतिसाद पाहून सचिनही भारावला. माझ्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण माझे अशा प्रकारचे संवाद अलीकडे कमी झाले आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला भेटून तुमच्यापेक्षा अधिक आनंद मला झाला आहे, असे त्याने सांगितले. अमित इंटरप्राइझेस हौसिंग लिमिटेडतर्फे सचिनने वापरलेले पाच किट या शाळेला लवकरच देण्यात येणार आहेत. याप्रसंगी अमित इंटरप्राइझेसचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटे, श्रीमती माई लेले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिल्पा देशपांडे, शाळेचे इतर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.